जिजाऊ सखी मंच गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा

1 min read

आळेफाटा दि.२०:- जिजाऊ सखी मंच गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आळेफाटा येथे पहिल्यांदाच महिलांनी एकत्रित येत सौभद्र हॉल मंगल कार्यालय येथे लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.गणपती मूर्ती आणण्यापासून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापासून गणपती विसर्जन करेपर्यंत सर्वच कार्य महिलावर्ग मोठ्या उत्साहाने पार पाडणार आहे.यावेळी दि 18 सप्टेंबर रोजी जिजाऊ सखी मंचच्या वतीने पुढाकारपणा घेत घोषणा देत आळेफाटा (ता.जुन्नर) बस स्टॅंड व परिसरातील कचरा आळे ग्रामपंचायत कचरा विलगीकरण स्टाफ, कणसे होमिओपॅथीक कॉलेजच्या विद्यार्थिनी, जिजाऊ सखी मंचच्या वतीने करण्यात आले. दि 19 सप्टेंबर रोजी आळेफाटा मुख्य चौकातून ढोल ताशांच्या गजरात गाजत वाजत सौभद्र हॉल मंगल कार्यालय पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवगर्जना देण्यात आली.पुरुष मंडळींना ही लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह मिरवणूकदरम्यान महिला वर्गाकडून बघावयास मिळाला.त्यानंतर सौभद्र मंगल कार्यालय येथे अत्यंत मनमोहक नयनरम्य फुलांची आरस करीत जवळपास साडे सहा फूट उंचीची लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.मूर्तीचे प्राणप्रतिष्ठाचे पौरोहित्य सौ दया धनंजय कुलकर्णी यांनी केले.यावेळी प्रतिदिन वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दि 20 सप्टेंबर रोजी अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे यात आळेफाटा परिसरातील हजारोच्या संख्येने महिला सहभागी होणार आहे.दि 21 सप्टेंबर रोजी महिलावर्गासाठी विविध आजारांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सौभद्र मंगल कार्यालय येथे करण्यात येणार आहे. दि 22 सप्टेंबर रोजी महिला वर्गासाठी नृत्य, एकांकिका, नाटक अशा विविध सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि 23 सप्टेंबर रोजी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.याच दिवशी तृतीय पंथीयांच्या हस्ते त्यांना आरतीचा मान देत गणरायची आरती पार पाडली जाणार आहे.दि 24 सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा, मंगळागौर स्पर्धा व विविध महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे.दि 25 सप्टेंबर रोजी गणरायाला विधिवत निरोप देण्यात येणार आहे.यावेळी लेझिम पथक, ढोल ताशा पथक, ध्वज पथक, पथनाट्य आदी पारंपरिक वाद्यांचा वापर करीत शाही मिरवणूक संपन्न होणार आहे.याचदिवशी आळेफाटा परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा करण्यात येणार आहे व महिलांसाठी लकी ड्रॉचे ही आयोजन करण्यात येणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या नयना डोके, माजी ग्रामपंचायत सदस्या वैशाली संजय देवकर, अमृता गडगे, लता वाव्हळ, वृषाली नरवडे, मनीषा सोनवणे, निशा शेट्टी, अपेक्षा कुऱ्हाडे, मंगल वाणी, अनुराधा सुपेकर, प्रांजल भाटे, वर्षा गुंजाळ, मंगल गांधी, सोनाली गांधी, पुनम गुगळे, दीपाली गडगे, पुनम हाडवळे, वैशाली जाधव. नलिनी सासवडे, हेमा जाधव आदी जिजाऊ महिला मंचच्या सदस्य सक्रियरित्या सर्वच कार्यक्रमात उपस्थित होत्या.आळेफाटा परिसरात प्रथमताच महिला वर्गाने एकत्रित येत पुढाकारपणा घेत सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून समाजाच्या सर्वच थरांतून पहिल्याच वर्षी कौतुकाची थाप मिळवलेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे