जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी येथे भरली आजी-आजोबांची शाळा

1 min read

गुळुंचवाडी दि.१७:- दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आजी -आजोबा दिन संपूर्ण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये पालक त्यांच्या मुलांसाठी त्यांचा संपूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. त्यावेळी कुटुंबातील आजी- आजोबा मुलांवर सुसंस्कार घडविण्याची मोठी भूमिका बजावत असतात. मुलांना आधार देणे त्यांच्यासोबत वेळ घालविणे, त्याचप्रमाणे मुलांना भावनिक आधार देणे, आणि मूल्य संस्कार रुजवण्याचे काम प्रत्येक कुटुंबात आजी-आजोबा करत असतात.’बालपण म्हटलं की आम्हाला आजी-आजोबाच आठवतात.जीव लावणारे, माया करणारे ते आजही आमच्या मनात असतात.’अशा या आजी-आजोबांप्रती प्रेम कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी येथे आजी आजोबा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रंगनाथ भांबेरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.”सूर म्हणतो साथ दे,दिवा म्हणतो वात दे,माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पाप्पा दे.”या कवी कुसुमाग्रजांच्या ओळी आज या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवायस आल्या.आजच्या या धकाधकीच्या जीवनात आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही.अशावेळी मुलांचे खरे मित्र त्यांचे आजी -आजोबा असतात. बाबांकडून किंवा आईकडून एखादी गोष्ट मिळवण्याचे खरे माध्यम हे आजी आजोबाच असतात,त्यांच्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मुलांना आज शाळेत मिळाली.महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाने शाळेत आजी आजोबा दिनाचे आयोजन करावयाचे असून त्यानुसार आज शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात आजी आजोबा कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला. खरं तर हा कार्यक्रम काय आहे, कसा आहे ते समजून घेण्यासाठी न भूतो न भविष्यती अशाप्रकारे सर्वच पालक वर्ग , आजी आजोबा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आज शाळेत उपस्थित होते.सर्वप्रथम आलेल्या सर्व आजी आजोबांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय मैदानापासून ते मुख्य प्रवेशदारापर्यंत आपल्या आजी आजोबांवर पुष्पवृष्टी केली. शालेय परिसरात सुंदर अशी रांगोळी व फलकलेखन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाद्यपूजन केले त्यानंतर औक्षण केले व आजी-आजोबांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांनी आजी आजोबांचे कुटुंबातील स्थान व महत्व यावर आपले मार्मिक विचार मांडले.या प्रसंगी अनेक आजी-आजोबांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. सर्वांनाच आपल्या लहानपणीचे शाळेतील दिवस आठवले.विद्यार्थ्यांनी देखील आपल्या आजी आजोबांच्या गोड आठवणी आणि प्रसंग सर्वांसमोर मांडले. यादरम्यान भूतकालीन आठवनींनी अनेक आजी-आजोबांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.आजी आजोबांच्या डोळ्यातील अश्रू निश्चितपणे शिक्षणाचे समाधान देऊन गेले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे जेष्ठ शिक्षक अशोक बांगर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर जाधव यांनी मानले.शाळेतील शिक्षिका सरिता मटाले, ज्योती फापाळे व नरजहाँ पटेल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांनीच आजच्या या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले आणि आम्हालाही आभाळ ठेंगणे झाले. यावेळी उपस्थित सर्वांना शाळेच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला मूर्त आणि सुंदर स्वरूप देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, सुषमा भांबेरे, विठ्ठल खिलारी,अनिल बांगर, सखुबाई भांबेरे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी गुंजाळ, देवकर,भांबेरे, काळे, जाधव,भागवत, शिंदे,जेडगुले, करडिले, भाईक, पवार,कोतवाल, दूधवडे, बोरुडे कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांचे आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा प्रकारे अतिशय हसत-खेळत, आनंदी, उत्साही व भावनिक वातावरणात आजी आजोबा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे