वळसे पाटील महाविद्यालयात विविध स्पर्धा

1 min read

निमगाव सावा दि.१५:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला आणि क्रीडा स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन मुला – मुलींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना पांडुरंग पवार, संदीपान पवार, परेश घोडे पद्ममुनी जैन महाविद्यालय पाबळ चे प्राचार्य डॉ. संजय घोडेकर, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. गणेश सोनवणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांच्या हस्ते वही, पेन व प्रमाणपत्र देण्यात आले. धनश्री गाडगे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.प्रा. अनिल पडवळ यांनी पांडुरंग पवार यांचा राजकीय जीवन प्रवास सांगितला.तसेच त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून आठवणींना उजाळा दिला.पांडुरंग पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून, दूरदृष्टी असणारा अभ्यासू तसेच समाजकारणातून जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचलेला राजकीय नेता अशी पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या कर्तुत्वाने त्यांनी ओळख निर्माण केली. असे मत व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. पद्ममुनी जैन महाविद्यालय पाबळचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कला गुण आणि नैपुण्य दाखवावे.तसेच उद्याचा यशस्वी खेळाडू,कलाकार हा महाविद्यालयीन जीवनातच घडत असल्याने आपल्या महाविद्यालयात राबविलेल्या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन, त्यामध्ये नैपुण्य मिळवून विद्यापीठाने राज्य राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले तसेच पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. गणेश सोनवणे यांनीही आपल्या कवितेतून महाविद्यालयीन तरुणाने सामाजिक भान ठेवून आदर्शवत वर्तन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड, प्रास्ताविक प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी साहेबाना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे