जमिनीच्या वादातून शेजाऱ्याला मारहाण करणे महागात ; ८ आरोपींना कारावास व दंड

1 min read

बोरी बुद्रुक दि.१३ :- दिवसेंदिवस जमीचे वाद वाढत चालले असून त्याचे रूपांतर मारहाणीत होते. जमिनीच्या वादातून शेजाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करणे बोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. जुन्नर न्यायालयाने ८ आरोपींना ९ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड शिक्षा सुनावली आहे.

रवींद्र कारभारी जाधव, विलास कारभारी जाधव, रेवजी दादाभाऊ जाधव, कारभारी दादाभाऊ जाधव (मयत), नवनाथ राजी जाधव, नंदा संजय जाधव, पार्वतीबाई कारभारी जाधव, मनीषा बबन जाधव, सुरेखा रवींद्र जाधव (सर्व रा. शिंदे मळा, बोरी बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे) या आरोपीना शिक्षा सुनावली आहे.

गुन्ह्यातील आरोपीना दोषी धरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाल घोरपडे यांनी ९ महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

याबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरी बुद्रुक, शिंदे मळा येथे दि. ११ मार्च २०११ रोजी फिर्यादी कांताराम बबन जाधव (वय ४३ रा. शिंदे मळा, बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) यांचे शेताचे बांधावर यातील यांनी बेकायदेशीर गर्दी जमवून संगनमताने फिर्यादीचे जमीन गटनंबर २४२ चे शेताचे बांधावरील लहान मोठी झुडपे तोडली.

जमिनीचा दावा जुन्नर कोर्टात चालू आहे, असे फिर्यादी सांगत असताना आरोपी रवींद्र जाधव याने हातात दांडके घेऊन फिर्यादीचे डोक्यात व दोन्ही हाताच्या पंजावर मारहाण केली तर घरातील लोकांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादी यांची पाण्याची पाईपलाईन तोडून १६०० रुपयांचे नुकसान केले.

याबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी वकील ॲड गोकुळ खोडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार काठे यांनी केला तर गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून ॲड.गोकुळ खोडे यांनी काम पाहिले.

गुन्ह्याचे कोर्टाचे कामकाज नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो. नि. महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस शिपाई किर्वे यांनी पाहिले तसेच जिल्हा कोर्ट तपासी अधिकारी म्हणून सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे