पारनेरच्या प्रफुल्ल झावरे ची प्रो- कबड्डीच्या तेलगू टायटन संघात निवड
1 min readपारनेर दि.७:- वासुंदे (ता. पारनेर) येथील अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रफुल्ल सुदाम झावरे या तरुणाची प्रो-कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वासाठी निवड झाली आहे.नोव्हेंबर २०२३ पासून या स्पर्धा सुरू होणार असून स्पोर्टस चॅनलवर त्याचे प्रक्षेपण होणार आहे. त्यात देशभरातील बारा संघ सहभाग घेणार आहेत.तो अहमदनगर येथील पेरियार पॅंथर्स संघाचा टॉप चढाईपटू आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या; जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर व स्वकर्तृत्वावर संघर्षातून यश मिळवता येते हे त्याने सिद्ध करून दाखविले आहे. प्रचंड जिद्दीच्या जोरावर, ग्रामीण भागातील या तरुणाने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तेलगू टायटन संघात स्थान मिळविले आहे.या ६९ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अहमदनगर आहे. जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्याचा फार मोठा वाटा आहे. तो युवा कबड्डी सिरीज विजेता आहे. युनियन बँक व्यावसायिक संघ, मिडलाइन फाउंडेशनचा उत्कृष्ट चढाईपटू म्हणूनही त्याची ओळख आहे.नरेश नरवाल, अनिकेत म्हात्रे, रवींद्र गढे हे त्याचे राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक आहेत.ग्रामीण भागातील कबड्डी या लोकप्रिय खेळाला महत्त्वाचे स्थान मिळाले असून त्यामुळे अशा अनेक गुणी खेळाडूंनी संधीचे सोने केल्याचे दिसते. आपल्या टीमला यश मिळवून देण्याचा त्याचा संकल्प आहे.या गुणी खेळाडूचा ढोकेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी म्हणून प्राचार्य वाव्हळ, पर्यवेक्षक सावंत व सर्व शिक्षकांनी सन्मान केला. वासुंदे येथील ग्रामस्थांनीही त्याचा सन्मान करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.