वकील उज्ज्वल निकम यांचे उद्या आळेगावात प्रथमच आगमन; अ‍ॅड. विजय कुऱ्हाडे यांच्या कार्यालयाचे उदघाटन

आळे दि.२ : येथील उपसरपंच अ‍ॅड. विजय कुऱ्हाडे यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी जगप्रसिद्ध वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे उद्या रविवार दि.३ रोजी आगमन होत आहे. ओझर गणपती येथे महाअभिषेक, खोडद जीएम आरटी संस्थेला भेट, प्रकट मुलाखत असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम असून त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव अ‍ॅड.अनिकेत निकमही येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे प्रथमच आपल्या गावात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केल्याचे सरपंच प्रीतम काळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले .राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. विजय कुऱ्हाडे यांच्या घरात चारजण वकील आहेत. त्यांचे धाकटे बंधू संदीप आणि वहिनी अलका हे आधीच वकील झाले असून आता विजय व त्यांची शिक्षिका पत्नी स्मिता यांनाही वकिलीचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या कार्यालयाचे उदघाटन अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते होणार आहे. निकम यांचे, वकील चिरंजीव अनिकेतसह, सकाळी दहा वाजता आगमन होईल. ते ओझरच्या गणपतीला महाअभिषेक घालतील. देवस्थानच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न होईल,अध्यक्ष गणेश कवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत. नंतर ते दुपारी बारा वाजता खोडदच्या संस्थेला भेट देतील. त्यानंतर दुपारी श्री क्षेत्र आळे रेडा समाधी मंदीर येथे दर्शनासाठी आगमन व साडेतीन वाजता ‘भारतीय लोकशाही, संविधान व कायदा अभ्यासताना’ या विषयावर त्यांची व अ‍ॅड.अनिकेत यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ गझलकार, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप निफाडकर घेतील. मुलाखतीला सर्व बार असोसिएशनचे वकील तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. मुलाखतीनंतर लगेचच कार्यालयाचे उदघाटन होईल. सरपंच. काळे म्हणाले, ” या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित रहातील.
हे सर्व कार्यक्रम आळेफाटा येथील नगर रस्त्यावरील साई पार्क येथे होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे