कुकडी डाव्या कालव्याला झाडाझुडपांचा धोका; पांडुरंग पवार यांचे पाटबंधारे विभागाला निवेदन

1 min read

बोरी दि.३० :- कुकडी डावा कालवा किमी नं.८ (आठ) (बोरी बु||) हद्दीपासून पुढे १८ किमीपर्यंत जाधववाडी, साकोरी व मंगरूळ (ता.जुन्नर) हद्दीपर्यंत कालवा दोन्ही बाजूकडील झाडे झुडुपे काढून टाकावीत तसेच सेवा रस्त्यावर खड्डे बुजविणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. कॅनॉलच्या दोन्ही बाजूने खूप झाडेझुडुपे वाढली असून त्याचा कालव्यास भविष्यात धोका होऊ शकतो तसेच परिसरातील शेतकरी देखील या रस्त्याचा वापर करतात.

रस्त्यावर पडलेले खड्डे व झाडे झुडुपे यामुळे अपघात देखील होऊ शकतो. तसेच कुकडी डावा कालवा वरील बोरी बु।। हद्दीत किमी १० व किमी ११ किमी च्या दरम्यान उत्तर बाजूस पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठते.

यामुळे लगतच्या शेतकऱ्यांचे शेती व पिकाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तरी कालव्याच्या उत्तर बाजूचे पूर्वेकडील ओढ्यापर्यंत चर काढल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळू शकेल.

तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी कुकडी पाटबंधारे प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांना दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे