मोटार वाहन निरीक्षकांनी दिले सह्याद्री व्हॅलीच्या विद्यार्थांना रस्ता सुरक्षेचे धडे
1 min readराजुरी दि.२९:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मोटार वाहन निरिक्षक तानाजी धुमाळ आणि तेजश्री कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. आजच्या जगात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. ज्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता सुरक्षेकडे लक्ष न देणे. ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे रस्ते अपघात दिवसेंदिवस कसे वाढत आहेत असे त्यांनी सांगितले.अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले. जसे की, मुलांना रस्ता सुरक्षेची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. वाहतूक अपघातांचे सर्वात सामान्य कारण म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे. खालील रस्ता सुरक्षा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास रस्ते अपघात बर्याच प्रमाणात टाळता येऊ शकतात. वाहन चालवताना किंवा बाइक चालवताना, सीट बेल्ट आणि हेल्मेट घालणे यासारख्या सुरक्षा खबरदारी वापरा.वाहन चालवताना फोनवर बोलणे या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत.नेहमी रस्त्याचे नियम पाळा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.मद्यपान करून वाहन चालवू नका आणि प्रवासात धूम्रपान करू नका कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ वापरू नका. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सायबर फसवणूक क्रेडीट कार्डद्वारे होणारी फसणूक कशा घडत आहेत या विषयी माहिती तसेच समाजामध्ये घडणाऱ्या चोरी, दरोडे यापासून समाजातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सावधानता कशी बाळगावी त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर सोशल मीडिया द्वारे मुलींची व मुलांची होणारी फसवणूक याबद्दलही विद्यार्थ्यांनी जागृत राहिले पाहिजे असे ते म्हणाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ सहाय्यक मोटार व निरीक्षक तेजस्वी कुलकर्णी आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, महाविद्यालयाचे संचालक सचिन चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य बलराम सर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन प्रा.भालचंद्र मुंढे आणि प्रा. वैभव नांगरे यांनी केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल उद्धव भारती यांनी केले.