खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आळेफाट्यावर रस्तारोको; हजारोंच्या संख्येने शेतकरी उतरले रस्त्यावर

1 min read

आळेफाटा दि.२२:- खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आळेफाटा येथे महविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणात कांदा निर्यातीवर ४० % निर्यात शुल्क आकारणीच्या विरोधात तालुक्यातील शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले.

यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निर्यातशुल्क आकारणीच्या घोषणेचा जाहीर निषेध केला.मोदी सरकारच करायचं काय..खाली डोकं वर पाय….मोदी सरकार हाय हाय…शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत आळेफाटा चौक दणाणून सोडला.

यावेळी कल्याण नगर व पुणे नाशिक हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघावयास मिळाल्या.यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.गेल्या ३ वर्षांपासून शेतमालाला हमीभाव नसुन यंदा अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असून हाताशी आलेल्या कांदा पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाहीये.

शिवाय सरकारच्या निर्यातशुल्क आकारणीच्या घोषणेमुळे शेतकरण्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली असुन शेतकरी अक्षरशः आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही, कांदा नियातशुल्क आकारणीचा निर्णय सरकारद्वारे मागे घेण्यात यावा.

ठिकठिकाणी आंदोलनाची तीव्रता व्यापती बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४५० रु प्रति क्विंटल दराने खरेदी करणार असल्याबाबतचे ट्विट केले. मात्र शासनाने कांदा ४ हजार रु प्रति क्विंटल दराने खरेदी करावा अशी आग्रही मागणी शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आली.


माऊली खंडागळे, शरद चौधरी, मोहन मटाले, अनंतराव चौगुले आदी सर्वच पक्षीय नेत्यांनी कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाच्या विरोधात आपापल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी जि प सदस्य पांडुरंग पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले,

शिवसेना तालुका उपप्रमुख व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य माऊली खंडागळे, शिवसेना नेते शरद अण्णा चौधरी, भीमाशंकर सहकारी कारखाना माजी चेअरमन व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आंबेगाव देवदत्त निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, गोमाता पतसंस्था चेअरमन सुरेश गडगे, बाजीराव ढोले,

अशोक घोडके, मोहन मटाले, अनंतराव चौगुले, शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे, संजय भुजबळ, गणेश कवडे, जीवन शिंदे, आळे गाव उपसरपंच विजय कुऱ्हाडे, बाळासाहेब काकडे, अनंतराव गटकळ आदी सर्वपक्षीय नेते, कांदा उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी बांधवांच्या कांदा, सोयाबीन, टोमॅटो, कापुस अशा कोणत्याच पिकांना हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे.परदेशातील शेतकरी मालामाल होत असताना येथील शेतकरी लयाला जात आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या शेतीमालाचा बाजारभाव ठरविण्याचा अधिकार मिळावा.कांद्याला नाफेडमार्फत ४ हजार रुपये प्रति क्विंटल खरेदीभाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी सरकारला कांदा विक्री करणार नाही.”

डॉ.अमोल कोल्हे
खासदार शिरूर लोकसभा

“शेतीला वाईट दिवस आले आहेत. तालुक्यात तसेच पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात दुष्काळ परिस्थिती आहे. कोणत्याही मलाला बाजार भाव नाही.शेतकऱ्यांची हितासाठी हे आंदोलन उभ केला आहे. असे आंदोलन देशभर होत आहेत. या आंदोलनातून वाढीव निर्यात शुल्क चा निर्णय मागे घेतला नाही तर दिल्ली सारखे मोठे जनआंदोलन उभ राहू शकते.”

माऊली खंडागळे
संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,जुन्नर

शेतकऱ्यांना जो मातीत घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा मोदी सरकारच्या मनसुबा शेतकरी कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायचं काम मोदी सरकार करत आहे.”

अंबादास हांडे
शेतकरी संघटना पुणे जिल्हा

शेतकरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहे. सातत्याने आपल्या व्यथा मांडत आहे. शेतीमाला बाजार भाव नाही केंद्राचा हा निर्णय चुकीचा आहे. शेतकरी संकटात पडला आहे. शेतकऱ्यांचा साठवलेला अर्धा कांदा खराब होत आहे.”

सत्यशील शेरकर
चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना,जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे