पावसासाठी गुळूंचवाडी ग्रामस्थांची पारंपरिक साद; ओल्या वस्रांवर देवीच्या दरबारात केला अंकोबा चिंकोबा

1 min read

बेल्हे दि.२२:- गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथे वरुणराजाची बळीराजावर कृपा व्हावी म्हणून शेतकऱ्याने ओल्या वस्रांवर देवीच्या दरबारात अंकोबा चिंकोबा करत झाडे लावण्याचे महत्व सांगितले.पावसाळी हंगाम सरत आला पण पाऊस अजून आला नाही त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग चिंतेत आहे. राज्यभर दुष्काळाचे सावट असून सगळे नाले बंधारे कोरडेठाक असल्याचे चित्र दिसून येत आहे. निसर्गापुढे बळीराजा हतबल झाला असला तरी देवावर त्याचा विश्वास असतो म्हणूनच गावोगावी शेतकरी पावसासाठी देवाकडे साकडे घालताना दिसत आहेत.गुळूंचवाडी येथे दर मंगळवारी ग्रामदेवता मळगंगा मातेची महाआरती होत असते. आज दि.२२ ऑगस्ट रोजी मळगंगा मातेच्या महाआरती दरम्यान जालिंदर डोंगरे यांनी पाऊस पडावा आणि शेतकरी सुखावा या उद्देशाने पारंपारिक पद्धतीने ओल्या वस्रानी अंकोबा चिंगोबा डोक्यावर घेऊन आई मळगंगेच्या चरणी आर्त हाक मारत आई दार उघड आई दार उघड वरुणराजा बरसून बळीराजा सुखी कर अशी प्रार्थना केली.त्याच प्रमाणे शेजाऱ्याचे बांध कोरू नका बांधावर झाडे लावा झाडे जगवा असा देखिल संदेश या प्रसंगी जालिंदर डोंगरे यांनी जनतेला दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे