जिल्हा परिषदेच्या शाळेत खासदार व आमदार यांनी विद्यार्थ्यांशी केली हितगुज; विद्यार्थी गेले भारावून
1 min readआळे दि.१८:- लवणवाडी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केली यावेळी विद्यार्थी भारावून गेले.
या बाबत सविस्तर माहित अशी की, जिल्हा परिषद लवणवाडी शाळेने यांनी २४ जानेवारी २०२३ रोजी आठवडे बाजार भरविला होता. सदर बाजाराची बातमी पाहून आठवडे बाजाराचा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक ज्ञान मिळेल अशी फेसबुक पोस्ट खासदार साहेबांनी त्यावेळी केली होती.
तेव्हा मी या शाळेला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नर चे लोकप्रिय आमदार अतुल बेनके माजी जि.प.सदस्य शरद लेंडे व पांडुरंग पवार, माजी पं.स. सदस्य शाम माळी, आळे गावचे उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांच्या समवेत आज शाळेला भेट दिली.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केल्यामुळे लहान चिमुरड्यांचा आनंद गगनात मावेल असा झाला होता. आमदार अतुल बेनके यांनी लहान चिमूरड्यांना खासदारांकडे पाहून प्रश्न विचारला की, हे कोण आहेत तेव्हा सर्व लहान मुले एका सुरात मोठ्याने म्हणालीत डॉ.अमोल कोल्हे आहेत.
खासदार व आमदार यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा राणी मटाले व सहशिक्षिका दिपाली बेल्हेकर यांनी बसविलेल्या लहान मुलांच्या लेझीम पथकाने खासदार व आमदारांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरव कोकणे व सदस्य आणि लवणवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.