शिवशाहीला नारायणगावात अपघात; काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर
1 min readनारायणगाव दि.१८:- नारायणगाव (ता.जुन्नर) या ठिकाणी आज (दि.१८) सकाळी बाह्य वळणावर खोडद चौकात दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात लेन तोडून विरुद्ध दिशेला जाऊन शिवशाही बस ला अपघात झाला. पुणे- नाशिक महामार्गावर पुण्यावरून ही बस नाशिकच्या दिशेला चालली होती.या अपघातात दुचाकी स्वार सिद्धेश उर्फ साई सोपान पाटे यास किरकोळ दुखापत झाली आहे. तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.बस नारायणगाव येथील बाह्यवळणावरील खोड चौकात आली असता नारायणगाव येथून खोडद दिशेला दुचाकी घेऊन निघालेला साई उर्फ सिद्धेश हा देखील चौकात आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाहीच्या चालकाने बस विरुद्ध दिशेला नेली. त्यामुळे शिवशाही बसला अपघात होऊन बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर सिद्धेश उर्फ साईच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हा अपघात झाल्यानंतर शिवशाही बसचा हायड्रोलिक दरवाजा लॉक झाल्याने मदतीला आलेल्या नागरिकांनी बसची पुढील काच फोडून प्रवाशांना पिकअप गाडीच्या साह्याने बाहेर काढले. घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, हवालदार संतोष कोकणे, गंगाधर कोतकर व कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.