मातोश्री ग्लोबल स्कूलमध्ये संस्थेच्या अध्यक्षा मीरा आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण

1 min read

कर्जुले हर्या दि.१६:- मातोश्री ग्लोबल स्कूल कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. सुरुवातीस मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा मीरा आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या लहान लहान बालकांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले. यात राष्ट्रभक्तीपर समूह गान व भरतनाट्यम देखील सादर केले तर शाळेतील कल्पिता छाजेड व दीक्षा डुकरे यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे चित्र आपल्या भाषणातून प्रेक्षकांसमोर उभे केले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी देशभक्तीपर पथनाट्य,नृत्य, व विविध स्वातंत्र्य सेनानींच्या भूमिका विविध वेषभूषा परिधान करून लहान लहान बालकांनी प्रस्तुत केल्या व उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले.तदनंतर मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ.दिपक आहेर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक वर्ष तुरुंगवास पत्करला छातीवर गोळ्या झेलल्या तर चंद्रशेखर आजाद, भगतसिंग व राजगुरू हे क्रांतिकारक शहीद झाले. अशा या शूरवीर स्वातंत्र सैनिकांच्या त्याग, निस्वार्थ देशभक्ती व समर्पणातूनच अखेर इंग्रजांच्या दिडशे वर्षांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो. तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल,सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात तुरूंगवास व अनेक यातना सहन केल्या. सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरण्यात आले आणि शेवटी तो सुवर्णदिन आला व इंग्रजांची जुलमी राजवट संपून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला. दीपक आहेर पुढे म्हणाले की आज देशातील अनेक ठिकाणी जातीय तणाव, महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे सर्व रोखण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. समाजात सलोखा कसा राहील, भ्रष्टाचार कसा रोखता येईल यावर चिंतन करून प्रभावी उपाय शोधला पाहिजे.महिलांवरील अत्याचार रोखून महिलांचा सन्मान व आदर निर्माण होण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलनाकरिता प्रबोधन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. भारतात शांतता व सलोखा राहिला तर भारत देश जगात विकसित देश म्हणून प्रतिष्ठा मिळविण्यात फार वेळ लागणार नाही असेही आहेर आपल्या भाषणात म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेतील भारतीय नागरिकां चे मूलभूत हक्क, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, बंधुभाव लोकशाही मूल्य व समाजवाद अबाधित व सुरक्षित राहण्यासाठी सगळ्यांनी जागृत राहणे गरजेचे आहे असेही आव्हान दीपक आहेर यांनी आपल्या भाषणात शेवटी केले व उपस्थितीत सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.या सोहळ्या निमित्त मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान च्या अध्यक्षा मिराताई आहेर,खजिनदार बाळासाहेब उंडे, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर, संस्थेचे सेक्रेटरी डॉ.किरण आहेर, संस्थेच्या विश्वस्त व मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे. शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास, शाळेतील शिक्षक सुनील उंडे, सुनील रोकडे, फरिद पटेल जाफर शेख, प्रगती आहेर, सायली पिंगट, शुभांगी निमसे, सविता भांड, प्रतिमा पवार,अश्विनी केदार, किर्ती शिंदे तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या निवडूंगे व आभार विशाल डोळस यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे