धोंडे जेवणाचे साहित्य महिलेच्या जिवावर बेतले
1 min read
शिक्रापूर, दि.१३:- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरात जावई धोंडे जेवणाला येणार असल्याने धोंडे जेवणाचे काही साहित्य आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा एसटीचा धक्का लागून मृत्यू झाला.प्रमिला शिवाजी सासवडे (वय ६५, रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील प्रमिला सासवडे यांच्या घरी जावई धोंडे जेवणासाठी येत असल्याने प्रमिला सासवडे या काही साहित्य आणण्यासाठी पाबळ चौकात गेलेल्या होत्या.
साहित्य खरेदी करुन प्रमिला या रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने अहमदनगरकडे जाणाऱ्या एसटी बसचा धक्का प्रमिला सासवडे यांना लागला. त्या रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत संतोष सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी एसटीचालक बाबूराव काशीबा वानोळे (रा. भूरक्याचीवाडी रा. कळमनोरी जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.