दोन PMPML बसची समोरासमोर जोरदार धडक ; २९ प्रवासी जबर जखमी
1 min read
पुणे दि.२:- पुणे-नगर रस्त्यावर खराडी चौकाजवळ मंगळवारी (दि.१) सकाळी दोन बसची जोरदार टक्कर होऊन २९ प्रवासी जबर जखमी झाले. बसचालक गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तळेगाव ढमढेरे ते महापालिका भवन या मार्गावरील पीएमपी बस मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नगर रस्त्यावरून पुण्याकडे चालली होती. नगर रस्त्यावर खराडी – हडपसर चौकापासून नगर रस्त्याच्या दिशेला अडीचशे फुटांवर या बसची विरुद्ध दिशेने येत असलेल्या बसशी समोरासमोर धडक झाली.
त्यामध्ये दोन्ही बसमधील २९ प्रवासी जखमी झाले. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या परिसरातही पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांच्या पथकाने व स्थानिक नागरिकांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. अपघातामध्ये अनेक प्रवाशांना चेहऱ्याला, हाता-पायांना इजा झाली.
त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही बसचे चालक आणि वाहकांनाही या घटनेत दुखापत झाली. अपघातात दोन्ही बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. या आकस्मिक घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले होते. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रवाशांच्या हात आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. काही प्रवाशांवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यासंदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.