बेल्हयात आजी- माजी आमदार व कार्यकर्ते एकमेकांना भिडले 

1 min read

बेल्हे दि.५:- बेल्हे (ता.जुन्नर) चे आजी- माजी आमदार व कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.या निमित्ताने आजी माजी आमदारांचा वाद पुन्हा एकदा समोर आला. बेल्हे गावातील रस्त्याच्या भूमिपूजना निमित्त माजी आमदार शरद सोनवणे व आजी आमदार अतुल बेनके एकमेकांना भिडले.

दोन्ही आमदार समर्थकांनीही कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार गावात शनिवार (दि.५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला.शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकें यांच्यामधील टोकाचा राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला.

यावेळी ‘चर्चा करायची नसेल तर मला गरज नसल्याचे शरद सोनवनेंनी बेनकेंना फटाकारले, तर रस्ता करत असताना अडचणीवर मात करुन पुढे जात असताना कुणाच्या राजकारणाची गरज नसल्याचे बेनकेंनी सुनावले.

यावरुन दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. आळेफाटा पोलीसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. बराच फौजफाटा तैनात करण्यात आला होता.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

दोन आमदारांच्या वादात आमचा काय दोष, आमचा रस्ता करून द्या असे म्हणत ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

या वेळी शरद सोनवणे यांनी देखील हे काम आधीच मंजूर असल्याचे सांगून भूमिपूजन पुन्हा होऊन देणार नाही असा पवित्रा घेतला. मात्र आमदार बेनके यांनी या सर्व गदारोळात गुलाल भंडारा उधळून व श्रीफळ फोडून रस्त्याचे भूमिपूजन करून घेतले.यावेळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह उचित पोलीस बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडून दिला नाही.

आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, बेल्हा राजुरी रस्त्याच्या पाचशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील आमदारांच्या अनास्थेमुळे रखडले होते. शिवाय काही गावकऱ्यांच्या दुकानांचे अतिक्रमण तसेच काही कारणांमुळे हा रस्ता करण्याचे थांबवण्यात आले होते. परंतु विद्यमान कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्यावर निधी पडला व त्याचे भूमिपूजन आज करण्याचे ठरले. मात्र केवळ राजकारण करत माजी आमदार शरद सोनवणे यांनी या कामात व्यत्यय आणण्याचा करत आहे असे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे