राज्याचे कृषी संचालक जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर; विषमुक्त शेतीवर मार्गदर्शन

1 min read

आळेफाटा दि.२:- जुन्नर तालुका दौर्‍यावर राज्याचे कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे व सेंद्रीय शेती संचालक गणेश तांबे यांनी १४ नंबर-काळवाडी- राजुरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन १० ड्रम थिअरी तंत्राने घरच्या घरी ई.एम.-2 द्रावणाचा वापर करून बनविल्या जाणाऱ्या दशपर्णी अर्क, अमिल अर्क, वेमिल अर्क, देशीकेल्प, मासा अर्क, फळार्क, खेकडा अर्क, कोंबडी अर्क इत्यादी अर्कांच्या वापराची माहिती शेतकऱ्यांकडून घेतली.

बायो-रिसोर्स सेंटर्सच्या उभारणीत या १० ड्रम थिअरी तंत्राचा अवलंब करून विषमुक्त शेतीच्या शासनाच्या धोरणांमध्ये त्याचा कसा समावेश करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानातून शेतकऱ्यांना आत्मांतर्गत शेताच्या बांधावरच निविष्ठा तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना शेतकरी गट व कंपन्यांसाठी राबविली जाणार असल्याचे तांभाळे यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच शेतकरी बचत गटांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना बायो-रिसोर्स सेंटर्स(BRC) (१०ड्रम मॉडेल) उभारणी करण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे व कृषी विद्यापीठांतून १० ड्रम थिअरी हा संशोधनाचा विषय ठरणार असल्याचे शाश्वत फार्मिंग फाऊंडेशनचे संस्थापक मंगेश भास्कर (द्राक्षतज्ञ) यांनी सांगितले.यावेळी कृषी अधिकारी गणेश भोसले,विरणक समवेत १०ड्रम थिअरी संशोधक मंगेश भास्कर,ज्योतीराम वगरे,आणे गावचे सुपुत्र शिवाजी कांबळे सह तुषार आहेर, सुजित पाटे,अंजली वामन, अजय बेल्हेकर,राजु औटी आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे