मालिका संपतेय, पण गोष्ट सुरूच राहणार!’- डॉ. अमोल कोल्हे यांचे सूचक ट्विट
1 min read
मुंबई दि.१:- ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या सोशल मिडियावर चर्चा सुरु होत्या. या चर्चांना पूर्णविराम देत मालिकेतील महात्मा जोतिराव फुलेंची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेल्या सूचक ट्विटमुळे मालिकेच्या समाप्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
“मालिका संपतेय, पण गोष्ट सुरूच राहणार!” असे ट्विट करत डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांत एखादी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, नेमकी कोणती नवी संकल्पना किंवा उपक्रम समोर येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मालिका बंद होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत वाहिनी किंवा निर्मात्यांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली, तरी सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहेत.महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
त्यामुळे मालिका समाप्त होत असली तरी डॉ. अमोल कोल्हे यांच्या सूचक वक्तव्यामुळे फुले दांपत्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रवास नव्या माध्यमातून पुढे सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आता डॉ. अमोल कोल्हे नेमकी कोणती घोषणा करतात, याकडे प्रेक्षकांसह सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
