तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका; ३३ जण अटकेत; २८ दुकानं सील

1 min read

मुंबई दि.३१:- राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारताच राज्यातील अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याविरुद्ध मुंढे यांनी अत्यंत आक्रमक आणि जोरदार मोहीम उघडली आहे.याचाच एक भाग म्हणून, २९ मे रोजी प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ३३ आरोपींना अटक केली असून २८ आस्थापना सील केल्या आहेत. या धडक कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानुसार, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काल एकाच वेळी बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या पाच विभागांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध मोठी कारवाई केली. या धडक मोहिमेदरम्यान विविध ठिकाणांवरून एकूण ६ लाख १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यभर अशी कडक कारवाई सुरू असतानाच, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कल्पक पुढाकारातून आता अन्न व औषधांबाबतच्या तक्रारींसाठी एक नवीन “अँप” तयार केले जात असून, नागरिकांसाठी लवकरच टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २९ मे रोजी बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध एकाच वेळी कारवाईचे सत्र राबवले. यामध्ये सर्वाधिक कारवाई कोकण विभागात झाली, जिथे तब्बल २० आस्थापनाविरुद्ध कारवाई करून २१ लोकांना अटक करण्यात आली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना कडक इशारा दिला आहे.जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करत नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात कुणी भेसळ केल्यास वा प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा उत्पादन केल्याचे आढळल्यास यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!