पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी:- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
1 min read
अहिल्यानगर दि.३१:- राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आनंदवार्ता धडकली आहे. ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन गेल्यावर्षी राज्य सरकारने विधानसभेत दिले होते.बच्चू कडू यांच्या आंदोलना नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली होती.
त्यानुसार यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही याविषयची तरतूद करण्यात आली. तर आता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची तारीखच जाहीर केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्रं तयार ठेवणे आवश्यक आहे. तर सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आणि नियमानुसार त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲग्री स्टॉकवर नाव नोंदणी आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतकरी कर्जमाफी विषयी मोठी घोषणा केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी येणाऱ्या 10 दिवसात कर्जमाफी केली जाईल असे जाहीर केले.
त्यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच आनंदून गेला आहे. मृगाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या डोईवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची घोषणा केली. त्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे.राज्य सरकारच्या कर्जमाफीचा केवळ शेतकर्यांनाच नाही तर सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनाही तसेच पीक कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना मोठा फायदा होईल.
सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांना पीक कर्ज माफीचा मोठा फायदा होईल. त्यांचे येणे, मोठी थकबाकी वसूल होईल. शेतकर्यांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार आहे. थकीत कर्ज शासन भरणार असल्याने बँकांची वसूली होणार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तर थकीत कर्ज खाती निरंक होणार असल्याने बँकांची पत सुधारणार आहे.
