कर्तव्यनिष्ठेचा उत्तुंग आलेख: शिक्षण विस्तार अधिकारी चांगदेव गवळी;३९ वर्षांची प्रदीर्घ सेवा
1 min read
पारनेर दि.३१:- “सागराचे संवर्धन करणाऱ्या जलधारांचे कौतुक शब्दांत कसे करावे? ३९ वर्षे ज्यांनी ज्ञान आणि प्रशासनाची गंगा अविरत प्रवाही ठेवली, अशा ऋषितुल्य आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा हा कृतज्ञता प्रवास…”पारनेर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागात कार्यरत असलेले, भाळवणी व टाकळी ढोकेश्वर बीटचे
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (श्रेणी-२) चांगदेव महादू गवळी साहेब हे दिनांक ३१ मे २०२६ रोजी तब्बल ३९ वर्षांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या आदर्श सेवाकालातील अखंड कार्याचा आढावा घेणारा हा एक संक्षिप्त कृतज्ञता वृत्तांत…
स्वकर्तृत्वाने घेतलेली उत्तुंग भरारी श्री रोकडीचा महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बाबुर्डी (ता.पारनेर) या गावचे ते भूमिपुत्र आहेत. एका सामान्य शेतकरी आणि अत्यंत साध्या कुटुंबात,घरात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा विशेष मार्गदर्शन नसतानाही, केवळ स्वकर्तृत्वाच्या, जिद्द आणि अपार मेहनतीच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग भरारी घेतली.
“घाम गाळूनी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पेरले, त्यांच्याच कष्टाने आज हे यशाचे सोनेरी पीक आले!”‘शिक्षण हीच समाजाची संजीवनी आहे’ हे ओळखून त्यांच्या आई-वडिलांनी मोलमजुरी करून आपल्या मुलाला शिकवले आणि प्राथमिक शिक्षक बनवले. प्राथमिक शिक्षक पदावर काम करत असताना आपल्या कामावरील निष्ठा,
प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त आणि विद्यार्थी हिताप्रती सदैव बांधिलकी मानून त्यांनी कित्येक पिढ्या घडवल्या. आज साहेबांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत, हाच त्यांच्या कष्टाचा खरा मोबदला आहे.अविरत सेवाप्रवास आणि सामाजिक बांधिलकी :नेवासा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या पानेगाव येथून सन १९८८ साली त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात केली.
नेवासा तालुक्यात जवळजवळ १८ वर्षे आणि त्यानंतर स्वतःच्या गृहतालुक्यात म्हणजेच पारनेर तालुक्यात उर्वरित २१ वर्षे त्यांनी अखंड सेवा केली. “विद्यार्थी हेच आपले दैवत असून आपण सर्व त्यांचे पुजारी आहोत,” ही प्रामाणिक भावना सदैव उराशी बाळगून त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शैक्षणिक कामकाज केले.
आयुष्यात आलेल्या अनेक संकटांवर आणि अडचणींवर मात करत, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत त्यांनी समाजाला मार्गदर्शनाचा व सामाजिक बांधिलकी जपण्याचा सदैव प्रयत्न केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय दबदबा प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि सध्या शिक्षण विस्तार अधिकारी
(श्रेणी-२) अशा विविध पदांवर काम करत असताना त्यांचे पाय सदैव जमिनीवर राहिले; त्यांनी मातीशी आपले नाते अधिक घट्ट ठेवले. आपल्या कामाचा एक उत्तम ठसा त्यांनी प्रत्येक पदावर उमटवला. साधी राहणी, शांत व विनम्र स्वभाव, कमालीची सचोटी, मेहनत, संयम आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी यामुळे त्यांचा अत्यंत दांडगा जनसंपर्क तयार झाला.
“नव्हती मनी सत्तेची हाव, केवळ जनसेवेचा ध्यास; म्हणूनच गवळी साहेबांच्या कर्तृत्वाचा, सुगंध दरवळला खास!”त्यांना मिळालेले प्रत्येक पद हे अधिकार अथवा सत्तेसाठी नसून केवळ सेवेसाठी आहे, हा विचार त्यांच्या मनात सातत्याने राहिला. त्यामुळे प्रशासकीय कामात अहंकाराचा वारा साहेबांना कधीही शिवू शकला नाही.
मिळालेल्या पदाने केवळ स्वतःची पायवाट प्रकाशित करण्यापेक्षा, इतरांना त्या प्रकाशाचा उपयोग होऊन त्यांचेही जीवन उजळून निघावे, यासाठी त्यांनी सातत्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे शिक्षकांना एक वेगळी ऊर्जा व प्रेरणा मिळाली आणि त्यांचा एक मोठा मित्रपरिवार निर्माण झाला.
त्यांचे निर्गवी असणे, इतरांची प्रतिष्ठा जपण्याचा लागवी व मनस्वी स्वभाव यामुळे सर्वांच्या मनात एक कौटुंबिक आपलेपणाची भावना आपोआपच निर्माण झाली. “नैतिकता ही मिळवण्याची गोष्ट नसून ती आचरणात आणण्याची गोष्ट आहे,” हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून दाखवले.
प्रशासनात केंद्रप्रमुख म्हणून वाडेगव्हाण,
पळवे खुर्द, सुपा, रांजणगाव केंद्रात आणि शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून भाळवणी व टाकळी ढोकेश्वर बीटमध्ये काम करत असताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परिणामी, दोन्ही बीटची आणि पर्यायाने पारनेर तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता कमालीची वाढली.
साहेबांच्या कार्यकाळात नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान, सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धा,तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये बीटमधील शाळा आणि विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले. अनेक शाळांनी जिल्हा स्तरावर तालुक्याचे यशस्वी प्रतिनिधित्व केले.
“गुणवत्तेचा नुसता जप करून गुणवत्ता वाढत नाही, तर दुर्गम भागातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रभावी मार्गदर्शन करणे आणि शिक्षकांना प्रोत्साहन देऊन प्रेरणा देणे यातूनच हे साध्य होते,” हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. कृतज्ञतेची भावना प्रशासनात काम करताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सर्व सहकारी विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख व पंचायत समिती शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी
यांच्याशी उत्तम समन्वय ठेवल्यामुळे सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले, असा उल्लेख ते सातत्याने करतात. तालुक्यातील व दोन्ही बीटमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक बंधू-भगिनी, मुख्याध्यापक, सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, पत्रकार बंधू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व शिक्षक संघटनेचे जिल्हा व तालुका अध्यक्ष व प्रतिनिधी—ज्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत झाली,
त्या सर्वांबद्दल ते मनःपूर्वक धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त करतात आणि आभार मानतात.दिमाखदार सेवापूर्ती सोहळा
आता ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होऊन अचानक या प्रवासातून बाहेर पडताना मनात निश्चितच विरहाची भावना जाणवणार असली, तरी केलेल्या कामाबद्दल ते पूर्णपणे समाधानी आहेत.
सेवा संपली असली तरी स्नेहाचे आणि प्रेमाचे ऋणानुबंध असेच जपून ठेवावेत, अशी विनंतीही ते आवर्जून करतात. प्रारंभ असला की विराम हा असणारच! संत तुकाराम महाराजांच्या—”याचसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिवस गोड व्हावा।।”या उक्तीप्रमाणे साहेबांचा दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी ‘सफलता मंगल कार्यालय, सुपा’ या ठिकाणी अत्यंत दिमाखदार सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून साहेबांप्रती आपल्या भावना व प्रेम व्यक्त केले. अत्यंत भव्य स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमावरून साहेबांचा समाजाशी असलेला संपर्क किती दांडगा होता, याची प्रचिती आली.या सोहळ्यासाठी अहमदनगर दक्षिणचे खासदार माननीय डॉ. श्री. निलेशजी लंके साहेब, नेवासा तालुक्याचे माजी आमदार माननीय पांडुरंग अभंग साहेब,
जिल्हा परिषद अहिल्यानगरचे माजी उपाध्यक्ष माननीय सुजितराव झावरे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष माननीय श्री. राहुल शिंदे पाटील व इतर अनेक राजकीय व सामाजिक मान्यवर उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील माननीय शिक्षणाधिकारी कडूस साहेब, माननीय थोरे साहेब, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिक्षक बंधू-भगिनी व नागरिक उपस्थित होते.
“ऋणानुबंधाच्या सुवर्णगाठी कधीच तुटत नसतात,क्षेत्र बदलले तरी स्नेहाचे दिवे कायम जळत असतात…”
सर्वांच्या वतीने आदरणीय गवळी साहेबांना निरामय दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा! यापुढेही त्यांच्या हातून असेच मोलाचे सामाजिक व शैक्षणिक कार्य घडत राहो, हीच सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या शब्दांकनाला पूर्णविराम देतो.
शब्दांकन:
सुदाम नारायण साळुंके
उपाध्यापक – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळशी.
