जुन्नर तालुका उष्णतेच्या तडाख्यात; पाण्यासाठी वन्यप्राण्यांची धावपळ
1 min read
बेल्हे दि.२७:- गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने तब्बल ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. कडक उन्हामुळे डोंगरदऱ्या, जंगल परिसर आणि ओढे-नाले कोरडे पडू लागल्याने वन्यप्राण्यांवर पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे.
तहानेने व्याकूळ झालेले बिबटे, हरिण, रानडुक्कर, कोल्हे तसेच विविध पक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे व रस्त्यांवर येताना दिसत आहेत.विशेषतः रात्रीच्या वेळी वनक्षेत्रालगतचे रोड, राज्य महामार्ग आणि हायवे परिसरात वन्यप्राण्यांची वर्दळ वाढली आहे.
पाण्याच्या शोधात भटकंती करताना अनेक वन्यप्राणी भरधाव वाहनांच्या धडकेत जखमी होत असून काहींचा जागीच मृत्यू होत आहे. यामुळे वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील अनेक पाणवठे, तलाव आणि नैसर्गिक झरे आटल्यामुळे वन्यजीवांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
जंगल परिसरातील पाण्याची कमतरता वाढल्याने वन्यप्राणी गावांच्या सीमेकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टाक्यांमध्ये किंवा विहिरीलगत पाण्याची व्यवस्था करून वन्यप्राण्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वनविभागाचे पाणवठे आहेत परंतु त्यांची अल्प संख्या असल्याने पर्यावरणप्रेमींनी वन विभागाने तातडीने जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्याची संख्या वाढवावी. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा तसेच वन्यजीव संवेदनशील भागांमध्ये वाहनांचा वेग मर्यादित करण्यासाठी सूचना फलक आणि गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
“वन्यप्राणी हे पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहेत. तीव्र उष्णतेच्या काळात त्यांना पाण्याची सोय करणे ही सामूहिक जबाबदारी आहे,” असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिकांनाही उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून
दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि जनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन प्रशासन व वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्थेकडून करण्यात येत आहे.
