गुळुंचवाडी आंब्याच्या बागा उध्वस्त; शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान
1 min read
बेल्हे दि २३:- गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.जोरदार वारा व पावसामुळे
गुळुंचवाडी येथे सिताराम देवकर, तुकाराम देवकर, नाथा देवकर यांच्याकडे आंब्याच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत.
सिताराम देवकर यांची हापूस, केसर, राजपुरी प्रजातीच्या सुमारे दीडशे झाडांची बाग आहे. वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेली आंब्याची बाग वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे क्षणार्धात उध्वस्त झाली. खराब वातावरणामुळे यावर्षी आंबे उशिरा पिकायला लागल्याने अद्याप आंबे तोडणी केली नव्हती.
पुढच्या आठवड्यात आंबे तोडून पिकवणार होतो. पण शुक्रवार दि.२२ रोजी झालेल्या वादळी पावसाने सर्व बागेचे आंबे पडून नुकसान झाल्याचे सिताराम देवकर यांनी सांगितले. अंदाजे २०० कॅरेट आंबे उत्पन्न निघाले असते तर शंभर रुपये प्रति किलोच्या दराने ३ लाख रुपये अपेक्षित होते.
पण पावसामुळे सगळेच आंबे गळून पडल्यामुळे कैऱ्या फुटून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सिताराम देवकर यांनी सांगितले.या वर्षी मार्केटमध्ये आंबे कमी प्रमाणात असल्यामुळे आंब्याला बाजारभाव उत्तम असल्यामुळे
मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली असल्याचे तुकाराम देवकर यांनी सांगितले.नुकसानग्रस्त परिसरात शासनाने पंचनामे करण्याची मागणी संतोष आग्रे तसेच ग्रामस्थान कडून होत आहे.
