शरद पवार गटाचे नेते, विकास लवांडे यांना अटक, वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप
1 min read
पुणे दि.२२:- वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपात शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी
त्यांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र पुणे कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा केला होता.
याप्रकरणी नलिनी आशिष वायाळ या महिलेने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ८ मे रोजी लवांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने लवांडे यांनी कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता मात्र कोर्टाने बुधवारी जामीन अर्ज फेटाळल्यामुळे विकास लवांडे यांना अटक करण्यात आली.
आपल्या एक्सवरील एका पोस्टमध्ये पोलिसांवर टीका करताना लवांडे म्हणाले कि पोलिसांची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशन एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना
मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले, मी घरी नव्हतो, कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला, कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय? असा माझा सवाल आहे?त्यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले कि पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही.
शासनाने मला जरूर अटक करावी, मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे, कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार. सत्याग्रही पद्धतीने वकील, दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.
आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत. असं म्हणत लवांडे यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला.काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील घुसखोरी यासंदर्भात विकास लवांडे यांनी केलेल्या विधाना वरुन त्यांच्यावर शाईच्या बाटल्या ओतल्या होत्या.
विकास लवांडे यांनी वारकरी सांप्रदायातील घुसखोर असं पोस्टरच रिलीज केलं होतं. त्याचाच राग मनात धरून संग्राम भंडारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लवांडेवर शाईफेक हल्ला केला होता.
