मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात या तारखेला दाखल होण्याचा अंदाज
1 min read
मुंबई दि.१८:- मान्सूनने अंदमान-निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय भाग तसंच श्रीलंकेचा काही भाग व्यापला आहे.
दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास अंदमानातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते. यंदा 4 दिवस आधीच मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे. यंदा केरळमध्येही तो वेळेच्या थोडा आधी म्हणजे 26 मेच्या आसपास दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पुढच्या 3-4 दिवसांत केरळ आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांत पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. या कालावधीत अंदमान बेटे, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांतही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एल निनोमुळे निर्माण झालेली स्थिती हे एक कारण त्यामागे असू शकते असे हवामान खात्याने या आधी म्हटले होते. मान्सून २६ मे ते ३१ मे दरम्यान केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केरळमध्ये दाखल झाल्यावर एका आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचतो.त्यामुळे ६ जूनच्या आसपास तो कोकणात पोहोचू शकतो. त्यानंतर तो उर्वरित महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात उकाडा आणि उष्णतेची लाट असली, तरी हवामानातील पोषक बदलांमुळे मान्सून वेळेआधीच किंवा वेळेवर महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, 18 मे रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.इथे लातूर, धाराशीव या जिल्ह्यांत पावसासाठी यलो अलर्ट आहे. तर परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट आहे.
