पॅसेंजर ट्रेनला अचानक लागली भीषण आग; रेल्वे स्थानकावर प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ

1 min read

पटणा दि.१८:- तिरुवनंतपुरम-हजरत निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच, आज (सोमवारी) सकाळी एका पॅसेंजर ट्रेनला आग लागली. बिहारमधील सासारामहून पाटणाकडे जाणाऱ्या या पॅसेंजर ट्रेनला अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जीव वाचवण्यासाठी त्यांची एकच पळापळ झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.पॅसेंजर ट्रेनला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात असून, तपासानंतरच खरे कारण समोर येईल. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दिलेल्या माहितीनुसार, तपास पूर्ण झाल्यावरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.मात्र, प्राथमिक अंदाजानुसार सासाराम-पाटणा फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा संशय आहे. ही दुर्घटना सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. सासाराम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर गाडी उभी असतानाच डब्याला आग लागल्याचे प्रवाशांच्या निदर्शनासाठी आले. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ सुखरूप बाहेर पडता आले. जर ही आग धावत्या ट्रेनला लागली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, रेल्वेचा एक संपूर्ण डबा जळून खाक झाला आहे. या घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तत्पूर्वी, खबरदारीचा उपाय म्हणून आग लागलेला डबा (बोगी) मुख्य ट्रेनपासून वेगळा करण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने या घटनेच्या सखोल तपासाचे आदेश दिले असून, सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!