महाराष्ट्र उकाड्याने घामाघूम; पुढील ५ दिवस काही जिल्ह्यात उष्णतेची लाट
1 min read
मुंबई दि.१३:- राज्यात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, मे महिन्यातही उष्णतेची तीव्रता कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे,जळगाव,नाशिक,अहिल्यानगर, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नंदूरबार जिल्ह्यात उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत सलग तीन दिवस हीटवेव्हचा इशारा आहे.
तर अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान,वर्धा,हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, आणि नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
