नेरळ–वांद्रे–शिरोली–पाबळ–शिरूर चौपदरी महामार्गास राज्य शासनाची मंजुरी

1 min read

पुणे दि.९:-मुंबई–पुणे वाहतूक कोंडी कमी करून मराठवाडा, अहमदनगर व पुणे जिल्ह्याला मुंबई आर्थिक केंद्राशी जलद जोडणी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नेरळ–वांद्रे–शिरोली–पाबळ–शिरूर चौपदरी महामार्ग प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प खासगीकरण तत्त्वावर राबविण्यात येणार असून यासंदर्भातील शासन निर्णय दि. ७ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या मंजुरीसाठी अनेकांनी सातत्याने सभागृहात आवाज उठवला होता. तसेच राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पाला गती दिली. शासनाने अखेर या महामार्गास मंजुरी दिली आहे. सदर महामार्ग रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून सुरू होऊन वांद्रे, शिरोली, पाबळ मार्गे पुणे- अहिल्यानगर रस्त्यावरील शिरूर येथे संपणार असून या मार्गाची एकूण लांबी २३३.७९५ कि.मी. इतकी आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच शिरूर, चाकण, तळेगाव व उरण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.विशेषतः चाकण, तळेगाव, शिरूर व उरण या औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार असून उद्योग क्षेत्रासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. औद्योगिक वाहतुकीसाठी पर्यायी सक्षम मार्ग उपलब्ध झाल्याने वेळ, इंधन व वाहतूक खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच मराठवाडा व अहिल्यानगर भागातून मुंबईकडे जाणारी वाहतूक अधिक गतिमान होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!