मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही; ममता बँनर्जी यांची मोठी घोषणा
1 min read
कोलकत्ता दि.६:-पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी निकाल मानायला नकार दिला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात निवडणूक निकालांनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताबदल होताच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत, पण सर्वात थेट आणि आक्रमक इशारा आला आहे तो ममता बॅनर्जी यांच्याकडून. पराभवानंतरही त्यांनी केवळ निकाल स्वीकारण्यास नकार दिला नाही,
तर आपण राजभवनामध्ये जाऊन राजीनामा देणार नाही, हेही स्पष्ट केलं आहे. हे विधान म्हणजे केवळ एक राजकीय प्रतिक्रिया नाही, तर तृणमूल काँग्रेस आता ज्या मोठ्या संघर्षाची तयारी करत आहे, त्याचे हे संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
निकालानंतर आयोजीत केलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्या सध्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. आम्ही निवडणुकीत पराभूत झालेलो नाही, तर एका नियोजीत कटांतर्गत आम्हाला हरवले गेले आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी यावेळी केला.
त्या म्हणाल्या कि, आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. माझ्या आयुष्यात मी असा निवडणूक प्रकार कधीच पाहिला नाही. 2004 नंतर इतका अत्याचार मी पाहिलेला नाही. निवडणूक आयोग हा मुख्य खलनायक आहे. एसआयआरमुळे 90 लाख मतं काढून टाकली गेली.
भाजपाने 100 जागांची लूट केली आहे. पुढे बोलताना ममता यांनी म्हटले की, इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. सोनिया गांधी यांनी मला फोन केला. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे,
हेमंत सोरेन आणि तेजस्वी यादव यांनीही मला फोन करून पाठिंबा दर्शवला. उद्या अखिलेश यादव येणार आहेत. आता मी स्वतंत्र पक्ष्यासारखी आहे. मला काही कामे करायची आहेत, पण आम्ही लढा सोडणार नाही.
