बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ले, त्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत; मुंबईतील ह्रदयद्रावक घटना
1 min read
मुंबई दि २८:- मुंबईतील पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अब्दुल आणि नसरीन डोकाडिया यांच्या घरी पार्टी होती. जेवणासाठी खास बिर्याणीचा बेत होता.
एकूण 9 लोकांनी रात्री 10च्या सुमारास ती बिर्याणी खाल्ली. त्यानंतर पाहुणे गेल्यावर रात्री 1.30 वाजता अब्दुल्ला, नसरीन आणि त्यांच्या दोन मुलांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागला. त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला कळवताच त्याने येऊन चौघांनाही औषध दिलं.
मात्र सकाळी देखील परिस्थिती तशीच असल्याने शेजाऱ्यांना सांगण्यात आलं. शेजाऱ्यांनी चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टर जैद कुरेशी यांना बोलावलं. त्यांनी लहान मुलीला CPR देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची काहीच मदत झाली नाही. त्यांना तात्काळ जेजे रुग्णालयात भरती करण्यात आलं.
सगळ्यांना चादरीची झोळी करून चौथ्या मजल्यावरून खाली आणल आणि थेट रुग्णाल्यात नेलं. तिथे थोडं शुद्धीवर आल्यानंतर अब्दुल्लाने आदल्या रात्रीचा घटनाक्रम सांगितला, त्यानंतर त्यांनी देखील प्राण सोडला. एकंदरीत पोलिसांनी यात Accidental Death Report दाखल केला असून चौकशी सुरु आहे. उरलेला अर्धा कलिंगड हा FDA ला पाठवला असून त्याचा तपास सुरू आहे.
मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याचे सांगितलं होतं. यामुळे ही विषबाधा बिर्याणीमुळे झाली की कलिंगडामुळे किंवा या दोन पदार्थांच्या एकत्रित सेवनामुळे काही रिअँक्शन झाले का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
पायधुनी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमार्टम अहवालातून स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अशा प्रकारे अंत झाल्याने पायधुनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
