आम आदमी पक्ष फुटला; ७ खासदारांनी अरविंद केजरीवालांची साथ सोडली

1 min read

नवीदिल्ली दि.२५:- देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षामध्ये खलबतं पहायला मिळत होती. त्याचेच आज परिणाम समोर आले आहेत. आम आदमी पार्टीनं काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरुन हटवलं होतं. त्यानंतर आता राघव चड्डा यांच्यासह पक्षातील ७ राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खासदार फुटल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.आदमी पक्षाचे प्रमुख नेते राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याच्या निर्णयानंतर राजकीय वातावरण अचानक तापले आहे. ७ खासदारांच्या फुटीनंतर प्रतिक्रिया देताना, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना केजरीवाल यांनी फक्त एका ओळीत आपले मत मांडले. त्यांनी लिहिले, भाजपने पुन्हा एकदा पंजाबी लोकांचा विश्वासघात केला आहे.दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिल्लीत आम आदमी पक्षाचे काही राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील झाल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे स्वाभाविक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आम आदमी पक्षाचे आणखी काही खासदार भाजपमध्ये सामील होऊ शकतात आणि पक्ष त्यांचे स्वागत करतो. तर आपचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, ‘ऑपरेशन लोटसचा खेळ खेळला जात आहे. आमच्या खासदारांना फोडले जात आहे. त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले जात आहे. ईडी-सीबीआयचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक मित्तल यांच्याकडे ईडीचा छापा पडला होता. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ईडीचा छापा पडला आणि त्यांना फोडले. याचा अर्थ भीती दाखवून आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून ऑपरेशन लोटस चालवले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!