जांबुतफाटा – निमगाव सावा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वाहन चालकांना प्रचंड त्रास

1 min read

निमगाव सावा दि.२५:- जुन्नर तालुक्यातील जांबुत फाटा ते भोरवाडी मार्गे निमगाव सावा या रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून, हे काम भविष्यातील वाहतुकीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. मात्र, काम सुरू असताना निमगाव सावा,शिरोली,भोरवाडी (ता.जुन्नर) परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट उडत असल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः दुचाकीस्वारांना या धुळीमुळे गंभीर त्रास होत आहे. वाहन चालविताना धूळ थेट डोळ्यांत जात असल्याने डोळ्यांत जळजळ, पाणी येणे तसेच काही वेळेस दृष्टी धूसर होणे अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून, वाहनचालकांचे जीवित धोक्यात येत आहे. तसेच पादचारी, शाळकरी मुले व वयोवृद्ध नागरिक यांनाही या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कामाच्या ठिकाणी नियमित पाण्याची फवारणी केली जात नाही. परिणामी, वाहनांची ये-जा वाढल्याने धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडत आहे. तसेच आवश्यक त्या सूचना फलकांचा अभाव, वेग मर्यादेचे कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन नसणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे. हे काम अनेक दिवसापासून सुरू असून अतिशय संथ गतीने काम चालू आहे. याबाबत संबंधित कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. काम सुरू असलेल्या भागात नियमित पाण्याची फवारणी करणे, धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, तसेच वाहनचालकांसाठी योग्य सूचना फलक व वेग मर्यादा निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.स्थानिक प्रशासनानेही या समस्येची तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी होत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास अपघातांची शक्यता वाढून मोठा अनर्थ होऊ शकतो. ही बाब तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोर यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!