गुळुंचवाडीत तळ्याई देवीचा यात्रौत्सव आनंदात संपन्न
1 min read
गुळुंचवाडी दि.२५:- गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील देवकर मळा येथे तळ्याई मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे तळ्याई देवीचा यात्रौत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.यात्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळी ७ वाजता देवीची पूजा प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व चोळी पातळचा कार्यक्रम करण्यात आला.
त्यानंतर आठ वाजता देवीच्या प्रतिमेची दुचाकी, चारचाकी तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने भव्य मिरवणूक काढून देवीच्या मांडव डहाळ्यांचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. मांडव डहाळ्याच्या मिरवणुकीत महिला आपल्या डोक्यावर कलशपात्र घेऊन उपस्थित राहिल्या होत्या.
मिरवणुकीत लहान मुले व महिला वर्ग पारंपारिक पद्धतीने फुगड्या खेळण्यात दंग झालेल्या दिसून येत होत्या. मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.मिरवणूक पार पडल्यानंतर तळ्याई मित्र मंडळाने भाविकांसाठी अल्पोहाराची सोय केली होती.
दुपारी देवीच्या प्रांगणात महिलांनी फुगड्या व संगीत खुर्ची अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विजेत्या स्पर्धकास तळ्याई मित्र मंडळाच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी चार वाजता शेरनी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर देवीचा प्रवचन व हरिपाठ करण्यात आला.
रात्री देवीच्या छबिन्याच्या मिरवणूकीदरम्यान शोभेच्या दारुकामासह फटाक्यांची आतिषबाजी पण करण्यात आली. त्यावेळी देवीचे प्रांगन विद्युत रोषणाईने पूर्णपणे उजाळून निघाल्याचे दिसून येत होते. छबीना व आतिषबाजी आटोपल्यानंतर झी टॉकीज फेम ह. भ. प. शिवशाहीर
कल्याण महाराज काळे पाटील भातकुडगाव, ता – शेवगाव, जि – अहिल्यानगर यांची कीर्तनसेवा झाली. मृदूंगवादक ह. भ. प. दिनेश महाराज भागवत, पेटीवादक ह. भ. प. गौरव महाराज करडीले, गायक दिगंबर महाराज गुंजाळ आणि जालिंदर महाराज गुंजाळ तसेच मळगंगा वारकरी शिक्षण
संस्था गुळुंचवाडी यांच्या बालकोरस संघाने अप्रतिम अशी कीर्तनसाथ दिली. कीर्तन सेवा झाल्यानंतर मंडळाच्या वतीने सर्व भाविकांसाठी आमटी भाकरीच्या महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. रात्री दहा नंतर शैनेश्वर भजनी मंडळ गुळुंचवाडी यांच्या भजनाच्या व देवीच्या महाआरतीच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता करण्यात आली.
