महात्मा ज्योतिराव फुले यांचा भारत सरकार देशव्यापी स्मरणोत्सव साजरा:- खासदार डॉ. अमोल कोल्हे

1 min read

पुणे दि.२१:- महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त भारत सरकार देशव्यापी स्मरणोत्सव साजरा करणार असून या कार्यक्रमास मार्गदर्शन आणि देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.फुले दाम्पत्याचा अभिमानास्पद इतिहास सांगणारी ‘मी सावित्रीबाई फुले’ ही डॉ. कोल्हे यांची मालिका सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेचे १०० भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. अशातच भारत सरकारने देशव्यापी स्मरणोत्सव समितीवर सदस्य म्हणून खासदार डॉ. कोल्हे यांची नियुक्ती करणे हा विलक्षण योगायोग जुळून आला आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ११ मार्च २०२६ रोजी काढलेली अधिसूचना १३ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १२६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यात खासदार डॉ. कोल्हे यांचा समावेश करण्यात आला आहे.महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२८ या दोन वर्षांच्या कालावधीत हा देशव्यापी स्मरणोत्सव साजरा करण्यात येणार असून भारतातील या महान समाजसुधारकाला केवळ अभिवादन नसून त्यांच्या सामाजिक न्याय, समानता आणि सशक्तीकरणाच्या चिरंतन विचारांना पुन्हा दृढ करण्याची संधी असल्याची भावना भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने व्यक्त केली आहे.फुले दाम्पत्याचा अभिमानास्पद इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी निर्मिती केलेल्या ‘मी सावित्रीबाई फुले’ ही मालिका सुरू असतानाच भारत सरकारने त्यांना देशव्यापी स्मरणोत्सव उच्चस्तरीय समितीवर नियुक्ती केल्याने त्यांना हा इतिहास प्रखरतेने मांडण्यासाठी बळ मिळणार आहे.या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महात्मा फुले २०० व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या देशव्यापी स्मरणोत्सवाच्या उच्चस्तरीय समितीवर माझी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून महात्मा फुले यांचा विचार तरुण पिढीत रुजविण्याचा आमचा प्रयत्न सफल होण्यासाठी या समिती सदस्यत्वाचा उपयोग होईल, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!