एस.टी.च्या ‘स्वच्छता कर’ निर्णयावर संताप; ग्राहक पंचायत आक्रमक
1 min read
बेल्हे दि.२१:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) कडून प्रवाशांच्या तिकिटावर २ रुपये ‘स्वच्छता कर’ आकारण्याच्या प्रस्तावित निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
बाळासाहेब सिताराम औटी, अध्यक्ष, मध्य महाराष्ट्र प्रांत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी या निर्णयाचा निषेध नोंदवत तात्काळ फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस.टी. ही ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी असून,
आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांवर हा कर अन्यायकारक आहे.राज्यातील अनेक बसस्थानकांवर स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत खराब असून, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी व कचरा व्यवस्थापनाच्या सुविधा अपुऱ्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा स्थितीत सेवा सुधारण्याआधी कर लादणे हे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छता राखणे ही महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, त्यासाठी स्वतंत्र कर आकारणे चुकीचे असल्याचा आरोप ग्राहक पंचायतने केला आहे.तसेच, या करातून जमा होणाऱ्या निधीचा वापर कसा होणार याबाबत पारदर्शकता नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
दरम्यान, ग्राहक पंचायतने या निर्णयाविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्याचा इशारा दिला असून, गरज पडल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
