गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर; राज्य सरकारचा आज महत्वपूर्ण निर्णय 

1 min read

मुंबई दि.१४:- दूध उत्‍पादक शेतक‍ऱ्यांना ३४ रुपये दर देण्‍याबाबत दूध दर निश्चित समितीने केलेली शिफारस राज्‍य सरकारने स्वीकारली आहे. राज्‍यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघानी दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना ३४ रुपये दर देण्‍याबाबतच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की,अडचणींचा सामना करणाऱ्या दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याची भूमिका राज्‍य सरकारची होती. यासाठी राज्‍यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध संघाच्‍या प्रतिनिधींची बैठक घेवून समिती गठीत करण्‍यात आली होती. या समितीने ३४ रुपये दर देण्‍याची शिफारस केली. त्‍यानुसार राज्‍य सरकारने आता गाईच्‍या दुधाकरिता किमान ३४ रुपये प्रतिलीटर दर देण्‍याचा शासन आदेश काढला आहे.

याची अंमलबजावणी करण्‍याबाबतही सुचित करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. दर ३ महि‍न्‍यांनी किमान दूध खरेदी दर निश्चितीबाबत शासनास शिफारस करण्‍याबाबतही या आदेशात सुचित करण्‍यात आले असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

याबाबतचा शासन आदेश निर्गमित करुन हे सरकार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे असल्‍याचा संदेश दिला असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. संगमनेर तालुक्‍यातील जोर्वे येथे भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित केलेल्‍या महाजनसंपर्क अभियानात मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित शेतकरी, ग्रामस्‍थ आणि युवकांशी संवाद साधून केंद्र व राज्‍य सरकारच्‍या योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी भाऊसाहेब इंगळे, सरपंच प्रिती दिघे, प्रवरा बॅंकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, शरद नाना थोरात, शिवाजीराव कोल्‍हे, राहुल दिघे, गोकूळ दिघे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांढरे आदी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी जोर्वे गावातील नागरीकांना महाजनसंपर्क अभियानाच्‍या निमित्‍ताने केंद्र सरकारच्‍या योजनांच्‍या माहिती पत्रकांचे वाटप केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे