तलाठ्यांनी गावागावात शेतकऱ्यांसाठी शिबिर आयोजित करा…शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेची संगमनेर तहसीलदारांकडे मागणी

1 min read

संगमनेर दि.२१:- संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीशी निगडित नोंदीला हजारो रुपयांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास नोंद होत नाही. तर शेतकऱ्यांना तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तरी तलाठ्यांना/मंडळ अधिका-यांना सूचना करून गावागावात शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून सहकार्य करावे. अशी मागणी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार संगमनेर यांचेकडे केली आहे. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालय समोर आंदोलनं करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात बहुतांश गावातील तलाठी आपल्या सज्जा मध्ये प्रामुख्याने हजर राहत नाहीत. तर यावेळी त्यांचे हाताखालील झिरो तलाठी त्यांचे कामकाज सांभाळत असतात. यावेळी शेतीशी निगडित नोंदी अथवा अन्य कामे घेऊन येणारे शेतकरी बांधवांची कामे जाणीव पूर्वक केली जात नाही. जर काम करायचे असेल तर त्यांचे अज्ञानाचा गैरफायदा घेत हजारो रुपयांची मागणी झिरो तलाठी यांचेमार्फत केली जात आहे. पैसे न दिल्यास काम होत नसल्याची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे.ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला आपल्या सातबारा वरील पोट -खराबा शेतजमीन जी वहिती करत आहे. ती पोटखराबा जमीनीची नोंदवहिला घेऊन सातबारा उतारा प्राप्त करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. यावेळी त्यांचे अज्ञानाचा गैरफायदा घेत जाणुनबुजून तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय असे नाहक हेलपाटे मारायला लावत आहेत. यात शेतकऱ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तर शेतकऱ्यांकडे या पोटखराबा जमिनीची नोंद वहिला घेऊन सातबारा उताऱ्यावर वहीतीची नोंद करण्यासाठी एकरी आठ ते दहा हजार रुपयांची मागणी झिरो तलाठी मार्फत केली जात आहे. तर पैसे न दिल्यास काम होत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी रखडल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये देत या नोंदी करून घेतल्या आहेत.ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांची नोंद सर्वात आधी होते तर ज्यांनी पैसे दिले नाही त्यांच्या नोंदी बाद देखील झाल्या आहेत. त्यांना अनेक कारणे सांगत त्यांच्या नोंदी आहे त्या स्थितीत आहेत.तालुक्यातील सर्वच तलाठी, मंडळ अधिकारी यांना सूचना करून संबंधित कार्यालय स्तरावर शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांचे प्रश्न सोडवावे. अन्यथा तहसील कार्यालय संगमनेर येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे यांनी तहसीलदार संगमनेर यांचेकडे दिले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.यादरम्यान एका बाजूला तालुक्यातील शेतकरी वर्गाला वेठीस धरून लयलूट सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील विविध भागांत अवैध गौण खनिज उत्खनन, अवैध गौण खनिज वाहतूक, अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर काही प्रमाणात पोलिस प्रशासन किरकोळ कारवाई करत आहे. परंतु महसूल प्रशासनाचे आधिका-यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे. तर महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहे. यात काही प्रमाणात तस्करांचे या अधिकान-यांशी लागेबांध असून यात काही प्रमाणात हात लाल होत असल्याची शंका शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे