१ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक:- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
1 min read
मुंबई दि.१५:- येत्या १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधितांची मराठी लिहिता,
वाचता येण्याबाबतची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असून, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.
राज्यात अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.
वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे.
