कल्याण – अहिल्यानगर महामार्गवर तिघा भावंडांचा अखेरचा प्रवास; पितृछत्र हरपलेल्या ३ भावंडांचा अपघातात अंत

1 min read

मुरबाड दि.१४:- सोमवारी दि.१३ दुपारी कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायते पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील सर्वजण काली पिली शेअरींग टॅक्सीने जात होते. रायते पुलावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की यात ११ जणांचा जागीच अंत झाला. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात अपघाताची भीषणता स्पष्टपणे दिसून आली.या अपघातामध्ये मृत पावणाऱ्यांमध्ये मुरबाड तालुक्यातील पऱ्हे गावातील तीन भावंडांचा देखील समावेश होता. आधीच वडिलांचं छत्र हरवलेली ही तिन्ही भावंडं आपल्या काकांच्या मुलाच्या हळदीसाठी आणि लग्नासाठी पर्हे (कांदली) येथे जात होते. त्यांच्या आईनं कुटुंबातील लग्न असल्याने आपल्या तिन्ही मुलांना पुढे पाठवलं होतं. त्या मागून जाणार होत्या. मात्र नियतीनं तिन्ही मुलं हिरावून घेतली आहेत. मानसी लक्ष्मण मोहपे (वय २२), नेहा लक्ष्मण मोहपे (वय १८) आणि प्रथमेश लक्ष्मण मोहपे (वय १५) असं अपघातात मृत पावलेल्या तीन भावंडांची नावं आहेत. सोमवारी रायते पुलावर झालेल्या अपघातात तिघांचं दुर्दैवी दुःखद निधन झाले.एका आईच्या उदरातील तीन लेकरं वडील नसताना कष्ट करून जीवापाड जपून वाढवलेली लेकरं एका क्षणात नियतीने हिरावून नेली. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी घरकाम करून या तिन्ही मुलांना मोठं केलं होतं. मुलांनीही कष्टाने शिक्षण घेतले. नोकरी करून आईला आधार देण्याचे स्वप्न ते पाहत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कल्याण-मुरबाड रोडवर झालेल्या अपघातात मूळचे मुरबाड तालुक्यातील असलेले आणि रोजीरोटीसाठी दिवा येथे राहणाऱ्या मोहपे कुटुंबातील दोन बहिणी आणि भावाचा करुण अंत झाला. त्यांच्या आईला आता कोणाचाही आधार नाही. ज्यांना लहानाचे मोठे केले, तेच तिला सोडून गेले. प्रथमेशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुटीचा आनंद,गावाची ओढ त्याला लागली होती. तिघा भावंडांचा हा अखेरचा प्रवास ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!