आंबेडकर विचार आत्मसात करा आणि शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा:- अध्यक्ष डॉ. शिवाजी पोखरकर

1 min read

बोटा दि.१४:- श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी (बोटा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृत करण्याचा संदेश देणारा ठरला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी पोखरकर, सचिव डॉ. अमित पोखरकर, प्राचार्य डॉ. सागर सांगळे, प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष डॉ. शिवाजी पोखरकर यांनी आपल्या संदेशात विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. “शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, समता व स्वाभिमान या मूल्यांचा स्वीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवावा,” असे त्यांनी नमूद केले.संस्थेचे सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी आपल्या संदेशात शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याच्या संस्थेच्या ध्येयधोरणांवर भर दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.प्राचार्य डॉ. सागर सांगळे आणि प्रा. लहू तांदळे यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आपले मत प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरला.तसेच विद्यार्थ्यांनी भाषण व अभिवाचनाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणा व सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली.कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन प्रा. निशा वरे व प्रा. स्वप्नील वरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.शेवटी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!