“शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा संदेश देत समाजसुधारक महात्मा फुले जयंती साजरी”
1 min read
बोटा दि.११:- श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी (बोटा) येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमास फार्मसीचे प्राचार्य डॉ. सागर सांगळे, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. केशव आरोटे, कार्यालय अधीक्षक बाळासाहेब शेळके,
समन्वयक प्रो. निशा वरे, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. सागर सांगळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात महात्मा फुले यांच्या शिक्षणप्रेम,स्त्री-सशक्ती करण व सामाजिक समतेच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांनी आपल्या प्रभावी संदेशात सांगितले की, “महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमता दूर करण्याचा जो लढा दिला, तो आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या विचारांचा स्वीकार करून सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.”
तसेच सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणे हेच खरे राष्ट्रनिर्मितीचे कार्य आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून आपण समतेवर आधारित प्रगत समाज घडवू शकतो.”
विद्यार्थ्यांनीही महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर करून त्यांच्या महान कार्याला अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रमात समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले.
