महात्मा फुले यांचे विचार समाजाला दिशादर्शक दीपस्तंभ:- संदिपान पवार
1 min read
निमगाव दि.११:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संदिपान पवार यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष मा. संदिपान पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांना उभारी दिली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून समाज परिवर्तनाची क्रांती घडवून आणली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची आज अधिक गरज आहे.
कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी पुढे नमूद केले की, “शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असून विद्यार्थ्यांनी ज्ञान, समता आणि मानवतेच्या मूल्यांना जोपासावे. महात्मा फुले यांचे विचार हे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत.”या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
