भाईंदरमध्ये अग्नितांडव; अनेक झोपड्या जळून खाक

1 min read

मुंबई दि.११:- मुंबईजवळील भाईंदर पूर्वे भागामध्ये पुन्हा एकदा भीषण आगीची घटना घडली आहे. इंद्रलोक पोलीस चौकीच्या परिसरात झोपड्यांना भीषण आग लागली आहे. आगीमध्ये अनेक सिलेंडरचा स्फोट झाला आहे. आतापर्यंत २९ सिलेंडर घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वे भागामध्ये इंद्रलोक पोलीस चौकीच्या परिसरात लोधा कॉम्प्लेक्स मागे असलेल्या मोकळ्या जागेत रात्री ८ वाजेच्या दरम्यान फार मोठी भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं आणि अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या.आग लागल्या नंतर अनेक सिलेंडरचे स्फोट झाले. नेमकी आग कशाने लागली हे समजू शकलं नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या असल्याचं सांगितलं जातंय. या आगीत कोणी जखमी झाले का हे अजून समजू शकले नाही.दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभाग आणि स्थानिक नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून आतापर्यंत 29 सिलेंडर बाहेर काढण्यात यश आलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध झोपडपट्टी असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांनी अनेक तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा नगरसेवक विशाल पाटील यांचा दावा आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन विभागाच्या मार्फत केलं जात आहे. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. या आगीमध्ये अनेक झोपड्याा या जळून खाक झाल्या आहेत. काही वाहनं सुद्धा आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!