जुन्नरमध्ये वन्यजीव संवर्धनासाठी सर्पमित्रांची झटपट सेवा; जनजागृतीतून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न
1 min read
जुन्नर दि.७:- जुन्नर तालुक्यात वन्यजीव निसर्ग संवर्धन व वन्यप्राणी रक्षणासाठी कार्यरत असलेल्या “वन्यजीव निसर्ग संवर्धन” संस्थेच्या सर्पमित्रांनी आपल्या धडाडीच्या आणि निस्वार्थ सेवेमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवस असो वा रात्र, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो ही टीम तत्काळ घटनास्थळी धाव घेत
वन्यजीवांचे प्राण वाचवण्याचे कार्य करत आहे. ग्रामीण व शहरी भागात सापांविषयी असलेली भीती आजही मोठ्या प्रमाणात दिसून येते. अनेकदा अज्ञानामुळे सापांना मारले जाते. मात्र ही चुकीची समजूत दूर करण्यासाठी सर्पमित्र सातत्याने जनजागृती करत आहेत.
साप हे पर्यावरणासाठी उपयुक्त असून ते शेतीतील उंदीर व इतर कीटकांचे नियंत्रण करतात, याबाबत नागरिकांना योग्य माहिती दिली जात आहे.सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तापमानात मोठी वाढ झाली असून गारवा, पाणी आणि आश्रयाच्या शोधात साप मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्याचबरोबर मार्च ते मे हा कालावधी अनेक सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने एकाच ठिकाणी दोन ते चार साप आढळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना संपर्क साधावा, सापांना इजा करू नये, असे आवाहन संस्थेकडून करण्यात येत आहे.
ही टीम केवळ सापांचेच नव्हे तर पक्षी, वन्यप्राणी आणि विशेषतः बिबट्यांच्या रेस्क्यूमध्येही सक्रिय आहे. मानवी वस्तीत आढळणाऱ्या जखमी पक्ष्यांना उपचारासाठी मदत करणे, बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करणे, तसेच त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या अधिवासात परत पाठवणे ही जबाबदारीही ते पार पाडत आहेत.
ज्या भागात बिबट्यांचे हल्ले होण्याची शक्यता अधिक आहे, त्या ठिकाणी विशेष जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी कसे वागावे, पशुधन सुरक्षित कसे ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले जाते.यामुळे मानव आणि बिबट संघर्ष कमी करण्यासाठी मोठी मदत होत आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आकाश माळी यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष दीपक माळी, खजिनदार सतीश घाडगे, सचिव हेमंत घाडगे तसेच सदस्य सुरेश गायकवाड, ऋषी वावळ, आदित्य हांडे, प्रज्ञेश काशीकेदार, जितू भोर, भाऊ घोडे आणि वैभव गावडे हे सर्पमित्र समर्पित भावनेने कार्य करत आहेत.
स्वतःच्या वेळेचा व खर्चाचा विचार न करता समाजहित आणि पर्यावरण संवर्धन यासाठी ही टीम सदैव तत्पर असते. वन्यजीव संरक्षणासोबतच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करून समाजामध्ये सहअस्तित्वाची भावना वाढवण्याचा प्रयत्न या सर्पमित्रांकडून होत आहे.
त्यांच्या या कार्यामुळे अनेक वन्यजीवांचे प्राण वाचले असून नागरिकां मध्येही सकारात्मक बदल दिसून येत आहे.जुन्नर तालुक्यातील या सर्पमित्रांचे कार्य केवळ सेवा नसून पर्यावरण संवर्धनासाठीचा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
