पिंपळवंडी येथे मळगंगा माता यात्रा महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात
1 min read
पिंपळवंडी दि.७:- पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे श्री मळगंगा माता यात्रा महोत्सवाला शुक्रवार, दिनांक १० पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत असून हा महोत्सव तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी गाजणार आहे. यात्रेनिमित्त ग्रामस्थ व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष विवेक काकडे व बैलगाडा कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय शेठ टाकळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या यात्रेत पारंपरिक कार्यक्रमांसह आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः बैलगाडा शर्यत, कुस्ती आखाडा आणि लोकनाट्य तमाशा हे कार्यक्रम यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांमध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नामांकित बैलगाडा मालक व चालक यात सहभागी होणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी पारंपरिक “चोळी पातळ” या लोककलेचा कार्यक्रम होणार आहे, ज्यामुळे यात्रेला सांस्कृतिक रंग चढणार आहे.
यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी श्री मळगंगा मातेचा अभिषेक विधी पार पडणार असून त्यानंतर मांडव डहाळे काढण्यात येणार आहेत. दुपारी भाविकांसाठी शेरणी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री भव्य छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून शोभेची दारूकाम (आतषबाजी) यामुळे वातावरण दिमाखदार होणार आहे.
त्यानंतर सर्जेराव जाधव दावडी-निमगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे.रविवार, दिनांक १२ रोजी सकाळी तमाशा हजेरीचा कार्यक्रम पार पडणार असून दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे. या आखाड्यात नामवंत मल्ल सहभागी होणार असल्याने कुस्तीप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.
पिंपळवंडीतील हा मळगंगा माता यात्रा महोत्सव धार्मिक श्रद्धा,पारंपरिक संस्कृती व ग्रामीण क्रीडांचा संगम घडवणारा ठरत असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
