बेल्हे गावच्या उपसरपंच पदी नवनाथ शिरतर यांची बिनविरोध निवड
1 min read
आणे दि.८ :- बेल्हे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत नवनाथ शिरतर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे बेल्हे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राजेंद्र पिंगट यांची पंचायत समिती सदस्य पदी निवड झाल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.
या पदाच्या रिक्त जागेच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन मंगळवार दि.७ रोजी करण्यात आले होते. उपसरपंच पदासाठी नवनाथ शिरतर यांचा व एकूण आठ अर्ज दाखल झाले होते परंतु सर्वांनी समंजसपणे चर्चा करून शिरतर यांना संधी दिली व सर्वानुमते त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
नवनाथ शिरतर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गावातील विविध विकासकामांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.तरुणांशी असलेला दांडगा संपर्क आणि गावाच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने त्यांना संधी दिली.
निवडीनंतर नवनाथ शिरतर यांनी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे आभार मानले. “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर शिरतर यांचे पुष्पहार घालून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी के. एस. रामसिंग वाकडे यांनी काम पाहिले तर सरपंच मनिषा डावखर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.
