पांगरीचे पोलीस पाटील ज्ञानोबा मुंडे यांना मानाचा राज्यपाल पुरस्कार जाहीर

1 min read

परळी दि.८:- बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मौजे पांगरी येथील पोलीस पाटील ज्ञानोबा भगवानराव मुंडे यांची सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या ‘पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड प्रक्रियेत मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाला वेळोवेळी केलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल त्यांना हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि प्रभारी पोलीस उपाधीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा विशेष पाठपुरावा करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बीड येथील पोलीस मुख्यालयात आयोजित सोहळ्यात करण्यात येईल. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुंडे यांना प्रशस्तीपत्र आणि २५ हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार असून त्यांच्या या यशाबद्दल बीड पोलीस दलाने अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!