शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आता काँग्रेसचा नंबर:- आमदार रोहित पवार

1 min read

कर्जत दि.१२:- आमदार रोहित पवार यांनी काही – दिवसांपूर्वी सांगितले होते की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडले, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेससुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच ते परत येतील असा विश्वासदेखील रोहित पवारांनी व्यक्त केला. येत्या काळात पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करावे लागणार आहे. भाजपच्या गलिच्छ विचाराशी लढण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज असून येत्या काळामध्ये ‘बीजेपी’ला धडा शिकवायचा आहे, असा निर्धार नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल. या पक्ष फुटीबाबत लोकांमध्ये काय चर्चा आहे, यावरून राजकीय नेत्यांना अंदाज आला आहे, असेही पवार म्हणाले.राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार हे पहिल्यांदाच कर्जत या त्यांच्या मतदारसंघात आले होते. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यात शरद पवार यांचे वय काढल्याने ३० ते ४० टक्के लोक हे मागे फिरण्याच्या तयारीत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती ही आमदारांची देखील आहे. पुढच्या १० ते १५ दिवसांत बघा काय परिस्थिती राहते, असे रोहित पवार म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे