शेतकऱ्यांनो ऊस लागवड वाढवा:- तज्ञ संचालक विकास चव्हाण

1 min read

बेल्हे दि.२:- इतर पिकांचे सतत पडणारे बाजारभाव आणि शेतीत गुंतवलेले भांडवलही निघत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. या तुलनेत ऊसाला मिळणारा चांगला एफआरपी (किमान हमीभाव), कमी भांडवल व श्रम, तसेच हमखास नफा मिळवून देणारे पीक म्हणजे ऊस होय. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे वळावे,” असे आवाहन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक विकास चव्हाण यांनी केले. पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.सुरू हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात त्यांनी ऊस शेतीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळवण्या साठी आवश्यक विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी हिरवळीची खते, सेंद्रिय खतांचा वापर आणि पिकांची फेरपालट यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच योग्य वाणांची निवड, ‘सुपर केन’ तंत्रज्ञानाचा अवलंब, सरीतील योग्य अंतर, फुटव्यांची योग्य संख्या, संतुलित खत मात्रा आणि प्रभावी पाणी व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.स्वतःच्या ऊस शेतीतील अनुभव सांगत त्यांनी यशोगाथाही मांडली.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. गट व विभागनिहाय आयोजित करण्यात आलेला हा २१ वा शेतकरी मेळावा होता.कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे यांनी २०२६-२७ या हंगामासाठीचे ऊस लागवड धोरण, हंगामानुसार ऊस वाणांची निवड, एआय तंत्रज्ञानाधारित ऊस शेती तसेच कारखान्याच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य तथा गटनेते संभाजी चव्हाण, लोकनियुक्त सरपंच रेश्मा बोटकर, गोपाळकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश चव्हाण, सोसायटीचे चेअरमन कैलास डुकरे, बाळू डुकरे माजी संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी डुकरे, प्रभाकर तट्टू, अप्पा चव्हाण, सेंद्रिय शेती तज्ञ बाबाजी बांगर, बाबाजी बोऱ्हाडे तसेच बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच रामदास तट्टू यांनी केले, तर आभार प्रदर्शन कारखान्याचे रुपेश डेरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!