राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ धडाकेबाज निर्णय; दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ
1 min read
मुंबई दि.२:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली आज बुधवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने सहा महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब केले.
यामध्ये साकळाई उपसा सिंचन योजना, राज्य नदी पुनरुज्जीवर प्राधिकरण, अमरावतीमधील क्रीडा संकुल, अनुसूचित जाती उपवर्गीकरण निवेदन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतच्या निर्णयांचा समावेश आहे.
साकळाई उपसा सिंचन योजनेला गती
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील ३२ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १,२३४ कोटी १३ लाख रुपयांच्या तरतुदीला मंजुरी मिळाली. घोड धरणातून १.८० टीएमसी पाणी उचलून ९,६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना
राज्यातील ५४ प्रदूषित नदी पट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. मिठी, मुळा-मुठा, भीमा आणि पंचगंगा यांसारख्या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी २,००० कोटींचा निधी उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ
शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यात आली आहे. आता शिशुवर्ग ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, तर ११ वी-१२ वीच्या निवासी विद्यार्थ्यांना १,००० रुपये शिष्यवृत्ती मिळेल. यापूर्वी ही रक्कम केवळ १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान होती.
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत प्राप्त निवेदने आणि अर्जांचा विचार करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल मंत्रिमंडळाला सादर करेल.
भूमि अभिलेख विभागात नवीन पदे
भूमि अभिलेख विभागातील ‘भूकरमापक’ हे पद रद्द करून आता ‘परिरक्षण भूमापक’ हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण १०,६८३ पदांना मंजुरी देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतही सुधारणा होणार आहे.
अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी जमीन
अमरावती येथील मौजे नवसारी येथील १६,७०८ चौ.मी. जमीन अमरावती महानगरपालिकेला क्रीडा संकुलासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या जमिनीवरील जुने वाणिज्य वापर शुल्कही माफ करण्यात आले असून, यामुळे शहरात क्रीडा सुविधांचा विकास होणार आहे.
